सहज मी...


Best way to put it : Please don't find any references while reading. Sometimes fun value.

Done it long time back ( now check the year one would know when was it done ) . Used to write "Marathi" articles ,was editor and did things for magazines Seattle Maharashtra Mandal, was on SMM committee 2005 Vice President, editor / 2006 editor, 2007 BMM convention Seattle and some places and initially blog was open, things were published in magazines plus some other sites etc, then I just made it private, new year with old plus new .. (મરાઠી , ગુજરાતી.. Marathi, Gujarati, some other)

Thursday, September 13, 2007

पाऊस


पाऊस असं नुसतचं म्ह्टलं तरी वा~याची एक झुळुक अंगावरुन गेल्यासारखं वाटतं. भारतातल्या पावसाचं काही निरळचं असत. पाऊस येणार अस सांगणारा ढगांचा काळोख, जोरदार सुटलेला वारा, अग दोरीवरचे कपडे काढ ह्या हाका, गच्चीत काही ठेवलय का? एवढं म्हणेपर्यंत पडणारे सुरवातीचे टपोरे थेंब आणि त्यांबरोबर सुटलेला मातीचा सुगंध; सियाटलमध्ये तो कितीही प्रयत्न करुन मिळत नाही. कसं आहे ना, ग्रुहीत धरलेल्या गोष्टी नाही मिळणार हे कळल्यावर किती बेचैन होतं.

पहिला पाऊस असेल तर रस्त्यावर लोकांची होणारी तारांबळ आपण सगळ्यांनी अतिशय मजेनी पाहीली असेल. धावत धावत दुकानाचा आसरा घेणारे काही व त्यांच्याबरोबर आडोशाला आलेली कुत्री आणि मग कमीत कमी जागेत एकमेकांना न चिकटता पर्स, साडी आणि हातातलं सांभाळणा~या. उलटी झालेली छत्री सरळ करण्यात आपण भिजतोय हे विसरलेले काही, नेमका पाऊस जोरत आलाय आणि संध्याकाळी ट्रेन्स लेट झाल्या आहेत आता आपला मुलगा / मुलगी घरी कधी आणि कशी येईल या विचारांनी गैलरीत वाट बघत बसलेली आई. शाळेसाठी नवीन रेनकोट, गमबूट खरेदिसाठी उत्सुक चिमुरडी. गरम गरम बटाटेवडे खाण्यासाठी वडापाव सेंटरमध्ये झालेली गर्दी. शी ग बाई! त्या मंडईत किती घाण आणि कचया॓चा वास आहे, चिखलात भाजी आणायला नको वाटतं असं म्हणत खरेदि करणा~या बायका. काय गं, भाजी एवढि महाग ? असं विचारल्यावर नाशिकला खुप पाऊस झाल्यामुळे नुकसान झालं असं दर पावसाळ्यात उत्तर देणारी भाजीवाली हे सगळं आपण सर्वांनीच अनुभवलेलं.

पावसात समुद्र बघायला खुप मजा मग तो वरळीला असो, गेट वे औफ़ इंडीया असो किंवा अलिबागचा असो ते उसळ्णारं पाणी भल्या भल्यांच्या मनात धडकी भरवायचं. बच्चेकंपनी दिसेल त्या डबक्यात कागदाच्या होडया करुन सोडण्यात गुंग असायची. काही टारगट पोरं मुद्दाम अंगावर पाणी उडवायची. सर्वात जास्त मजा रिक्षा किंवा पाणी भरलेला ट्रक खड्डयातून जाताना असायची आणि मग म्युनिसीपालटीच्या कृपेने 'रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते' असं म्हणायची वेळ यायची.

भारतात, सगळ्यांनीच नोटीस केलयं का माहीत नाही, पण पावसाची वातावरण निर्मीती खुप छान असते. सरळच म्हणायच तर संध्याकाळी ६.०० वाजता विविध भारती रेडीओवर लागणारी सर्व गाणी पावसाची.... घन घन माला, आला पाऊस, घनं ओथंबून येती, नभ उतरु आलं, गारवा हे मिलींद इंगळेनी गायलेलं गाणं, ते सर्जा पिक्चर मधलं गाणं आत्ता मला आठवत नाही पण नेहेमी लागतं. मग चालु व्हायची लहान मुलांची गाणी सांग सांग भोलानाथ, वगैरे. एफ. एम.च्या जमान्यात म्हणजे आम्ही कौलेजमध्ये असताना 'बोस्को टुनाईट' असा काहीतरी कार्यक्रम लागायचा त्यात तुम्ही कोणालातरी गाणं डेडीकेट करु शकत होतात. तेंव्हा ईंग्लीश रोमांटीक गाणी लागायची, पाऊस हा नेहेमीच प्रेमळ भावत यायचा. आता रेडीओ मिर्ची जमान्यातही त्याच स्वरुप काही वेगळं नाही.

आपल्या सर्वांना हा अनुभव नक्कीच असेल पावसात का कुणास ठावुक लोकं खुप मदत करणारी बनतात; मग ते ट्रेन्स मध्ये असो किंवा तो गावाकडे आलेला पूर असो किंवा कुठेही कोणीही अडचणीत असोत, बहुतेक पाऊस स्वभावातही प्रेमाबरोबर गारवा घेऊन येतो.

पाऊस आला की पुणे मुंबई प्रवासाला खुप मजा यायची. आत्ता हायवेमुळे गावं जवळ आली पण ती मजा गेली. बदलापुर पासून हिरव्यागार टेकडया दिसणं चालु व्हायचं, कर्जत आलं की गरम बटाटेवडे आणि चहा घ्यायला ही गर्दी, मग पुढच्या सर्व प्रवासात निसर्गाचच साम्रज्य दिसायच. लोणावळा खंडाळा परिसरात घाटात दिसणारी माकडं, असंख्य धबधबे, त्या ओल्याशार गवतावरुन गाल फिरवावा असं वाटण्या इतपत सुंदर मऊ मखमली हिरव्या गच्च टेकडया, वा~यामुळे खिडकीतून अंगावर येणारे पाण्याचे शिंतोडे, बोगद्यातून जाताना अंधाराचा होणारा परिसस्पर्श. एक सुखावणारा अनुभव. रेल्वेमधलं आम्लेट इतर कधीही एवढं चांगलं लागलं नसेल.

या दिवसांत सहलीला एक आगळीच गंमत येते. आम्ही मैत्रीणी बदलापूर डैम, कोंडेश्वर, नेरळ, झेनीथ फौल्स, बारवी डैम, भंडारदरा धरण, अलिबाग, माळशेज घाट अशा ठिकाणी मजा करायचो. पुण्याला गेल्यावर हमखास सिंहगडाची फेरि व्हायची आणि लांबची म्ह्टलं तर भिमाशंकरची. धुंवाधार पाऊस, घाट, असंख्य धबधबे, दुथडी भरुन वाहणा~या नद्या, वाटेवरची गावं, हिरव्या कमानी केलेली रस्त्यावरची झाडं, डोक्यावर इरलं घेऊन शेतात पेरणी करणारे शेतकरी, रस्त्यातले धाबे, उन पावसाचा चाललेला लपंडाव, असे प्रवासातले असंख्य दुवे हरवलेल्या गोष्टींची वारंवार आठवण करुन देतात. भारतातल्या प्रवासात वाटेत कोणीच दिसत नाही आणि आपणच चाललोय, सर्व दुकानं बंद अस चित्र कधीच दिसत नसेल. तीच एक तिथली गंमत आहे.

असा हा पाऊस जसा तहानलेल्या मातीला नवजीवन देतॊ तसाच शिणलेल्या मनाला गारवा देतॊ. काल श्रीधर फडक्यांच 'ऋतु हिरवा ऋतु बरवा' हे गाणं ऐकताना सहज सुचलं म्हणून लिहीलं. मग कशी काय वाटली भारतातली पावसाळी यात्रा? तुम्ही पण आठव्णींत नक्कीच चिंब भिजला आसाल!

Published in SMM 2006 magazine SARATHI [ well I wrote it uder "Paus" and u might find "Rutu hirava" title etc (added this  2 /11/ 2021) ]